जुन्या जमान्यातील ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांचे निधन
मुंबई : विख्यात अभिनेत्री संध्या यांचे शनिवारी निधन झाले. त्या ९५ वर्षांच्या होत्या. झनक झनक पायल बाजे, नवरंग, सेहरा, दो आँखें बारह हाथ या हिंदी चित्रपटांच्या त्या नायिका होत्या. ख्यातनाम निर्माते - दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या त्या पत्नी होत. मराठीत त्यांची मुख्य भूमिका असलेला ‘पिंजरा’ हा चित्रपट विक्रमी चित्रपटांपैकी एक होय. यातील लावण्या आणि त्यावर संध्या यांनी केलेली नृत्य अविस्मरणीय ठरली. ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ हा देखील त्यांचा गाजलेला मराठी चित्रपट.
पंख होते तो उड आती रे..., ए मालिक तेरे बंदे हम..., अरे जारे हट नटखट... यांसह अनेक गाजलेली गाणी संध्या यांच्यावर चित्रीत झाली आहेत.‘नवरंग’ या चित्रपटात ’अरे जारे हट नटखट’ या गाण्यात त्यांनी पुरुष आणि स्त्री अशा दोन्ही वेशभूषेत केलेले नृत्य हा हिंदी चित्रपटातील अद्भूत प्रयोग ठरला. हे होळी गीत आजही असंख्य श्रोत्यांच्या स्मरणात आहे.
‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटात ख्यातनाम नर्तक गोपीकृष्ण त्यांचे नायक होते. संध्या शांताराम यांनी त्यांच्या तोडीस तोड नृत्य करून देशभरातील प्रेक्षकांची दाद मिळवली होती. शास्त्रीय नृत्याच्या समृद्ध परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारा हा चित्रपट देशभरातील सर्वसामान्य प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. व्ही. शांताराम यांच्या राजकमल चित्र मंदिर या संस्थेच्याच चित्रपटांमध्ये संध्या यांनी काम केले. तीन बत्ती चार रस्ता, जल बिन मछली नृत्य बिन बिजली, परछाई हे त्यांचे उल्लेखनीय हिंदी चित्रपट. गेल्या काही दशकांपासून संध्या सार्वजनिक जीवनापासून अलिप्त झाल्या होत्या. चित्रपटसंन्यास घेतल्यावर त्यांचे सार्वजनिक ठिकाणी क्वचित दर्शन झाले.