नवीन पनवेल शहरात उघड्यावरचे बार जोरात, उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर कारवाई होणार?
नविन पनवेल -
नवीन पनवेल शहरात रेल्वे स्थानक समोरील सिमा वाइन्स शॉप्स असून या वाइन्स शाँप समोर सायंकाळी फूटपाथ चकना विक्रेते बसतात.यामुळे काही मद्यप्राशन लोक पाण्याच्या बाटल्या मध्ये मद्य भरुन फूटपाथवर रस्त्यावर तसेच समोरील पार्किंग कट्टावर खुलेआमपणे दारू पिण्याचे प्रकार पाहायला मिळतात.महाराष्ट्र शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाच्या नियमानुसार दुकानावर दारू घेतल्यानंतर वाइन्स शॉपच्या बाहेरच तसेच उघड्यावर दारू पिण्यास मनाई असतानाही नवीन पनवेल शहरात अनेक ठिकाणी उघड्यावरच मद्यप्राशन करणाऱ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर मद्यप्राशन केल्यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.नविन पनवेल शहरात प्रत्येक विभागात वाइन्स शॉपची दुकाने आहेत. परंतु अनेक दुकानांच्या बाहेरच खुलेआमपणे दारू पिण्याचे प्रकार पाहायला मिळतात. नविन पनवेल शहरातील शिवाकाँम्प्लेक्स येथील बसस्थानकात सायंकाळी मोठ्या प्रमाणात खुलेआमपणे मद्यप्राशन केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शहरात विविध विभागांत असलेली उद्याने तसेच अडगळीच्या जागा या ठिकाणीही रस्त्यावरचा बार थाटल्याचे पाहायला मिळते.शहरात असलेल्या अनेक खाऊगल्ल्यांच्या ठिकाणी खुलेआम उघड्यावर मद्यप्राशन केले जात आहे .पोदी रस्त्यालगतचे सेक्टर १४ येथील धारण तलाव कट्टावर मुख्य रस्त्यालगत रिक्षा लावून रिक्षामध्ये बाटल्या घेऊन पदपथाच्या व अंधाराच्या मदतीने खुलेआम रस्त्यावरच मद्यप्राशन केले जाते. परंतु अशा रस्त्यावरील मद्यप्राशनामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात नवीन पनवेल परिसरात अनेक बार व रेस्टॉरन्ट आहेत. परंतु बारमध्ये जाऊन दारू पिणे परवडत नसल्याने विभागातील आडोशाच्या जागा, चायनीज दुकानाबाहेर असे रस्त्यावरचे बार पाहायला मिळतात. तसेच वाइन्स शॉपच्या बाहेर दारू पिणाऱ्यांवर कारवाई केल्यास अशा प्रकारांना आळा बसेल. त्यामुळे अशा उघड्यावरच्या बारवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.