उल्हास नदीने पूररेषा ओलांडल्याने रायतेपुलावरील वाहतूक तात्पुरती बंद*
*
*ठाणे, दि.28 (जिमाका):-* मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ठाणे-कल्याण महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. विशेषतः मुरबाडजवळच्या मुरबाड-म्हाळशेज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील रायतेपूल येथे पुराचे पाणी आल्याने वाहतुकीचा मार्ग तात्पुरता थांबविण्यात आला आहे. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, उल्हास नदीच्या पूररेषेच्या (HFL) वर पाणी आल्यामुळे आणि संभाव्य धोके लक्षात घेता, प्रशासनाने वाहतूक पूर्णपणे थांबविण्याचा निर्णय घेतला आहे.
ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी या संदर्भात तातडीने कार्यवाही करीत वाहतूक मार्गात बदल केल्याची माहिती दिली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या वाहनांना या मार्गावरून जायचे आहे, त्यांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा. या परिस्थितीवर स्थानिक पोलीस आणि वाहतूक विभाग लक्ष ठेवून आहेत. पाणी कमी झाल्यावर आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यावरच वाहतूक पुन्हा सुरू केली जाईल, नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे तसेच, प्रवासाला निघण्यापूर्वी वाहतुकीच्या स्थितीची माहिती घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
0000000