शेलघर येथे काॅंग्रेसच्या आढावा बैठकीला उत्तम प्रतिसाद
उलवे, ता. ८ : "रायगडमध्ये आजही चांगले कार्यकर्ते आहेत. राहुल गांधी यांचे मनापासून आभार मानले पाहिजेत. ते लढतायत, ते खरे शिलेदार आहेत. सध्या माणसे लढणारी हवीत. जीवन निरागसपणे जगा, मला काॅंग्रेसचे विचार पटलेच, म्हणून मी काॅंग्रेसमध्येच आहे. इथे सन्मान आहे. मी लोकांची कामे करतोय. त्यात मला आनंद आहे, आगामी काळात काॅंग्रेसचे दिवस येणारच!" असे काॅंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत म्हणाले. शेलघर येथे काॅंग्रेसच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. ही बैठक उत्साहात पार पडली. काॅंग्रेसविषयी साधकबाधक चर्चा झाली. यावेळी राणी अग्रवाल म्हणाल्या, "महेंद्रशेठ घरत यांचा काॅंग्रेमध्ये निश्चितच चांगला विचार केला जाईल. सध्या ज्यांनी काॅंग्रेस सोडलेली आहे, त्यांची बिकट अवस्था आहे. कार्यकर्ते हेच काॅंग्रेसचा कणा आहेत." रेखा घरत म्हणाल्या, "आपण सोशल मीडियावर सक्रिय व्हा, काॅंग्रेसविषयी चुकीचे बोलल्यास सडेतोड उत्तर द्या. महागाई आणि बेरोजगारी वाढलीय. त्याबाबत जनजागृती करून बीजेपीला 'सळो की पळो' करून सोडू या." ऑल इंडिया पेट्रोलियम युनियन सेक्रेटरी जनरलपदी निवड झाल्याबद्दल किरीट पाटील, काॅंग्रेसच्या उपाध्यक्षपद राणी अग्रवाल, सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, श्रीरंग बर्गे, श्रद्धा ठाकूर, नंदा म्हात्रे यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि गणेशमूर्ती देऊन यावेळी महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. महेंद्रशेठ घरत यांच्या मार्गदर्शनाखाली काॅंग्रेसची जिल्हा आढावा बैठक यशस्वी झाली. ही बैठक शेलघर येथील दिवंगत जोमा नारायण घरत समाजगृहात झाली. या बैठकीला रायगडच्या सहप्रभारी राणी अग्रवाल, एसटी काॅंग्रेसचे श्रीरंग बरगे, सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, श्रद्धा ठाकूर, मार्तंड नाखवा, निखिल ढवळे, नाना म्हात्रे, वैभव पाटील उपस्थित होते. त्यांनीही काॅंग्रेस पक्षाविषयी विचार व्यक्त केले. यावेळी महेश भोपी या तरुणाने काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा टॅटू हातावर कोरल्याबद्दल महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या बैठकीला तालुकाध्यक्ष, युवा अध्यक्ष आणि काॅंग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.