सार्वत्रिक निवडणुक-2025 साठी कोकण विभाग सज्ज
नवी मुंबई, (विमाका) दि. 14 :- चालू वर्षात होणाऱ्या जिल्हा परिषद, नगर पंचायत व महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक आढावा बैठक राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली आज कोंकण विभागात पार पडली. कोकण भवनातील पहिल्या मजल्यावरील समिती सभागृहात दोन सत्रांमध्ये ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत आगामी सर्वत्रिक निवडणूकीच्या पूर्व तयारीतील प्रत्येक टप्प्याचा आढावा घेण्यात आला. मतदार यादी अद्यावत करणे, मतदान केंद्रांचे नियोजन, कर्मचारी व सुरक्षा व्यवस्था, तसेच मतदार जनजागृतीसाठीच्या उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस राज्य निवडणूक अयोगाचे सचिव सुरेश काकाणी (भा.प्र.से.), कोंकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, राज्य निवडणूक आयोगाचे विशेष कार्यकारी आधिकारी अं. गो. जाधव, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, वसई-विरार महानगरपालिका आयुक्त एम.एम.सूर्यवंशी, मिरा-भायंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनिषा आव्हाळे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आयुक्त अनमोल सागर, जिल्हाधिकारी ठाणे डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे, जिल्हाधिकारी पालघर श्रीमती इंदूराणी जाखड, जिल्हाधिकारी रत्नागिरी एम. देवेंदर सिंह, जिल्हाधिकारी सिंधुदूर्ग अनिल पाटील तसेच निवडणूक संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोकण विभागांतर्गत येणाऱ्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या 7 जिल्हयांमध्ये एकूण 75 विधानसभा मतदार संघ आहेत. 7 जिल्हयांतधील महसूल गावांची एकूण संख्या 6 हजार 530 असून या गांवांमधील लोकसंख्या 2 कोटी 86 लाख 1 हजार 471 आहे. कोकण विभागतील 5 जिल्हयांमध्ये 45 पंचायत समित्या आहेत. त्यात ठाणे -05 , पालघर-08, रायगड-15, रत्नागिरी-09 आणि सिंधुदूर्ग-08 अशा पंचायत समित्या आहे. कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या 5 जिल्हयांमध्ये एकूण 27 नगरपरिषद/नगरपंचायत आहेत. त्यात ठाणे -02, पालघर-04, रायगड-10, रत्नागिरी-07 आणि सिंधुदूर्ग-04 अशा आहेत. कोकण विभागात बृहन्मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, भिवंडी निजामपूर, मिरा- भाईंदर, उल्हासनगर, पनवेल, नवी मुंबई अशा एकूण 9 महानगरपालिका आहेत. बैठकीदरम्यान राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, निवडणुकीची तयारी सुक्ष्म नियोजनानुसार पूर्ण व्हावी. कोणत्याही प्रकारचे अडथळे, तांत्रिक अडचणी किंवा मनुष्यबळाची कमतरता वेळेवर दूर करण्यात यावी. निवडणुकीदरम्यान पारदर्शकता, निष्पक्षता आणि शिस्त राखणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. *याबैठकीत खालील मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला* *मतदान केंद्रांचे नियोजन व सुविधा* सर्व मतदान केंद्रे मतदारांसाठी सहज उपलब्ध, सुरक्षित आणि सोयीस्कर असावीत. पिण्याचे पाणी, वीज, शौचालय, रॅम्प, प्रकाशव्यवस्था आणि सावलीची सोय सुनिश्चित करणे. अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देणे. संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय सुरक्षा दल, सीसीटीव्ही व वेबकास्टिंगसह कडक सुरक्षा तैनात करण्याबाबत सूचना दिल्या. *मनुष्यबळ व प्रशिक्षण प्रक्रिया* मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक मनुष्यबळाची तैनाती वेळेत पूर्ण करणे. मतदान अधिकारी, सहाय्यक अधिकारी, तसेच सुरक्षा दलाला आवश्यक प्रशिक्षण कार्यक्रम. ईव्हीएम (EVM) हाताळणीसाठी विशेष प्रात्यक्षिक सत्रे घेण्यात येणार आहेत. *सुरक्षा व्यवस्था* संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची ओळख पटवून पोलीस तैनाती वाढविणे. स्थानिक पोलीस, राज्य राखीव पोलीस व केंद्रीय सुरक्षा दलांचा योग्य समन्वय. निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करणे याबाबत आढावा घेतला. *ईव्हीएम (EVM) यंत्राची उपलब्धता* कोकण विभागातील मतदान केंद्रानूसार आवश्यक ईव्हीएम यंत्रांची अचूक मागणी करण्यात यावी. यंत्राच्या सुरक्षीतेबाबत योग्य नियोजन करावे. यंत्र ज्या ठिकाणी साठवून ठेवण्यात येणार आहेत तेथील सुरक्षेबाबत विशेष नियोजन करण्याबाबत सूचना दिल्या. *मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती मोहिम* कोकण विभागात ग्रामीण भाग मोठा आहे. त्यामुळे मतदान जानजागृतीवर विशेष भर देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. मतदार जागरूकता रॅली, सांस्कृतिक कार्यक्रम, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग. पोस्टर, बॅनर, सोशल मीडिया मोहीम आणि डिजिटल प्रचार साधनांचा वापर. महिलांचा, युवा वर्गाचा व प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांचा सहभाग वाढविण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सर्व अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष व पारदर्शकपणे पार पाडण्याचे आवाहन केले. त्यांनी मतदारांच्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय वाढवावा, असेही नमूद केले. तसेच नागरिकांनी मोठा संख्येने मतदान करुन मतदानाच्या टक्केवारीत वाढ करावी आणि लोकशाही बळकट करावी असे ही श्री. वाघमारे यांनी आवाहन केले. या आढावा बैठकीमुळे कोंकण विभागातील निवडणुकीच्या तयारीस वेग मिळाला असून, मतदारांचा विश्वास दृढ करण्यासाठी आणि पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे. *******