डाक विभागाचे डिजिटल पाऊल* *‘IT 2.0 Aplication’ प्रणालीचा शुभारंभ
नवी मुंबई, (विमाका) दि. 30 : भारतीय डाक विभागाने एक महत्त्वपूर्ण डिजिटल पाऊल उचलले आहे. डाक व्यवस्थेत पारंपारिक प्रणालीच्या पुढे जात ‘IT 2.0 APT ॲप्लिकेशन’ प्रणालीचा प्रारंभ करण्यात येत आहे. डाक विभागाच्या राष्ट्रीय स्तरावरील डिजिटायझेशन मोहिमेअंतर्गत हा महत्त्वाकांक्षी बदल करण्यात येत आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी नवी मुंबई पोस्टल डिव्हिजन अंतर्गत सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये दि. ४ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार असल्याची माहिती भारतीय डाक नवी मुंबई विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. *डिजिटल प्रणालीचा गाभा : जलद व सुरक्षित सेवा* नवीन ‘APT ॲप्लिकेशन’ प्रणालीमुळे ग्राहकांना अधिक जलद, पारदर्शक व सुरक्षित सेवा मिळणार आहे. यासाठी सर्व डिजिटल यंत्रणांचे आधुनिकीकरण करण्यात आले असून, ०२ ऑगस्ट २०२५ रोजी सर्व संबंधित सेवांची यशस्वी समायोजना (डाउनटाईम) पार पडणार आहे. या काळात कोणत्याही डाक व्यवहारासाठी संबंधित पोस्ट कार्यालयांमध्ये सेवा उपलब्ध राहणार नाही. या कालावधीनंतर डेटा स्थलांतरण, प्रणाली बदल, सेवा एकत्रिकरण आणि संरचना प्रक्रियांचे अंतिम टप्प्यावर काम पूर्ण केले जाईल. परिणामी, नव्या प्रणालीमुळे सेवांचे डिजिटायझेशन अधिक सक्षम, यशस्वी व सुरक्षितपणे लागू करण्यात येईल. *ग्राहक अनुभव व सेवा कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा* APT ॲप्लिकेशन प्रणालीमुळे डाक सेवांचा अनुभव अधिक वेगवान, सुलभ आणि ग्राहकाभिमुख होणार आहे. डाक व्यवहारासाठी इंटरफेस आधारीत सेवा, ऑनलाइन व्यवहार, डेटा ट्रॅकिंग, रिअल टाईम अपडेट्स, वापरकर्ता अनुकूल प्रणाली या सुविधांचा लाभ ग्राहकांना मिळणार आहे. भारतीय डाक विभागाने ही प्रणाली भविष्यातील गरजांचा विचार करून विकसित केली असून, भविष्यातील पोस्ट सेवा अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि डिजिटल रूपात बदलण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. सर्व ग्राहकांनी आपल्या गरजेनुसार वेळेत भेट नियोजित करावी. ०२ ऑगस्ट २०२५ रोजी होणाऱ्या प्रणाली समायोजनामुळे डाक सेवा बंद राहाणार असल्याने कोणतीही तातडीची सेवा गरज असल्यास ०२ ऑगस्ट २०२५ पूर्वी पूर्ण करून घ्यावी. अशी आवाहानात्मक विनंती भारतीय डाक नवी मुंबई विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी केली आहे. भारतीय डाक विभागाने ही प्रणाली राबवण्यामागे सेवा कार्यक्षमतेत वाढ करणे, जलद सेवा देणे, आणि डिजिटलीकरणाचा लाभ ग्रामीण व शहरी भागातील सर्व ग्राहकांपर्यंत पोहोचवणे, हा मुख्य हेतू ठेवला आहे. APT ॲप्लिकेशन प्रणाली ही परिवर्तनाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा असून, डाक व्यवहार अधिक विश्वासार्ह व डिजिटल करण्यासाठीचा हा सकारात्मक प्रयत्न आहे. ********