स्व. संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार जाहीर...  विनायक पाथ्रूडकर आणि माधव पाटील सत्कार मूर्ती  २७ एप्रिल रोजी होणार सन्मान 
नेरळ,ता.२५ बातमीदार                         महाराष्ट्र शासनाच्या अधिस्वीकृती समितीचे सदस्य दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या जयंतीनिमित्त स्व. संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.राज्यातील संपादक यांना दिला जाणारा राज्यस्तरीय संपादक पुरस्कार दैनिक लोकमतचे संपादक विनायक पाथ्रूडकर यांना तर जिल्हास्तरीय जेष्ठ पत्रकार पुरस्कार पनवेल येथील जेष्ठ पत्रकार माधव पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान,दिवंगत संतोष पवार यांच्या  २७ एप्रिल रोजी नेरळ येथे हा पुरस्कार वितरण सोहळा मान्यवरांचे उपस्थितीत होणार असल्याची माहिती कर्जत प्रेस क्लब कडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.         माथेरान येथील पत्रकार आणि महाराष्ट्र शासनाच्या जनसंपर्क विभागाच्या अधिस्वीकृती समितीचे माजी सदस्य संतोष पवार यांचे कोरोनामुळे दि. ९ सप्टेम्बर २०२० रोजी निधन झाले. राज्यभर वावर असलेले संतोष पवार यांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी स्व. संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार देण्याचा निर्णय कर्जत प्रेस क्लब ने घेतला होता. पहिल्या वर्षी २०२१ रोजी दैनिक दिव्य भास्कर चे राज्य संपादक संजय आवटे यांना तर जिल्हास्तरीय जेष्ठ पत्रकार पुरस्कार कर्जतचे विजय मांडे यांना देण्यात आला होता. २०२१चा पहिला पत्रकारिता सोहळा संतोष पवार यांच्या जन्मगावी माथेरान येथे झाला होता. यावर्षी २०२२च्या स्व.संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार समितीने राज्यस्तरीय संपादक पुरस्कार आणि जिल्हास्तरीय जेष्ठ पत्रकार पुरस्कार जाहीर केला. यंदाच्या पुरस्कारार्थी मध्ये येथील जेष्ठ पत्रकार संतोष पेरणे, विजय मांडे, संजय मोहिते, धर्मानंद गायकवाड, दर्वेश पालकर आणि कर्जत प्रेस क्लब अध्यक्ष राहुल देशमुख यांचा समावेश आहे.        स्व.संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय संपादक पुरस्कार २०२२ दैनिक लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक विनायक पाथ्रूडकर यांना ११००० रुपयांचा धनादेश, समानचिन्ह, मानपत्र,शाल,श्रीफळ देऊन तर रायगड जिल्हास्तरीय जेष्ठ पत्रकार पुरस्कार पनवेल येथील जेष्ठ पत्रकार माधव पाटील यांना ५५०० रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल,श्रीफळ देण्यात येणार आहे. नेरळ येथील कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर असलेल्या जेनी ट्युलिप सिबीएससी स्कुलच्या प्रांगणात हा सोहळा होणार आहे.स्व संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या राज्यमंत्री अदिती सुनील तटकरे असणार आहेत. तर मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे,रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार जेष्ठ नेते सुनील तटकरे,कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड हे प्रमुख  राहणार आहेत. जेष्ठ विचारवंत आणि मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक,मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष पाबळे, रायगड प्रेस कलुबचे अध्यक्ष भारत रांजणकर, तसेच रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे,माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे,माथेरानच्या मावळत्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत,कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी,नेरळ च्या सरपंच उषा पारधी यांच्यासह जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, तालुक्याचे प्रांत अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार विक्रम देशमुख, पोलीस उपाधीक्षक विजय लगारे आणि संतोष पवार यांच्या मातोश्री सुशीला धोंडू पवार आणि पत्नी मनीषा संतोष पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.       कर्जत प्रेस क्लब च्या माध्यमातून होत असलेल्या या पुरस्कार सोहळा बाबत अध्यक्ष राहुल देशमुख आणि सर्व पदाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रक काढून सदर पुरस्कारांची घोषणा केली आहे. मुख्य कार्यक्रमाच्या आधी स्वरानुभूती वाद्यवृंद कडून देशभक्तीवर गीतांचा कार्यक्रम होणार आहे.