गुरु स्कूल, तळोजा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
• Raju pandharinath gade
तळोजा - तळोजा फेज–२ येथील ओमकार एज्युकेशन सोसायटी संचलित गुरु स्कूल येथे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ चे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस समारंभ “इतिहासाची पाने : काळाच्या प्रवासातील एक सफर” या संकल्पनेवर अत्यंत उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. प्रवीण राजाराम मुंढे (अवर सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र राज्य) उपस्थित होते. तसेच उद्घाटक पाहुणे म्हणून श्री. शरद वसंत सावंत (संपादक – खबरे आज की, प्रसिद्ध उद्योजक, नवी मुंबई) यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये श्री. शांताराम लोंढे (विधी अधिकारी, महाराष्ट्र राज्य), श्री. रचित छेडा (चेअरमन, केपीसी पब्लिक स्कूल, खारघर), श्री. विलास पाटील (आर.एस.पी.महाराष्ट्र राज्य समुपदेशक), डॉ. श्रुती निलेश जाधव (प्रिन्सिपल, गोखले एज्युकेशन सोसायटी लॉ कॉलेज, खारघर) तसेच श्री. गंगाधर परब (इंजिनीयर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक कालखंडांवर आधारित नृत्य, नाट्य व सांस्कृतिक सादरीकरणे सादर करून प्रेक्षकांना इतिहासाच्या प्रवासाचा मनोहारी अनुभव दिला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उपस्थित मान्यवर व पालकवर्गाकडून भरभरून दाद मिळाली.
कार्यक्रमास पालकवर्ग व स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. शाळेच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करत सर्वांच्या सहकार्याबद्दल आभार मानले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत यशस्वी व संस्मरणीय ठरला.
