पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या अध्यक्षपदी राजेंद्र पाटील यांची निवड
पनवेल / प्रतिनिधी तालुका पत्रकार विकास मंचाच्या अध्यक्ष पदी राजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली. दिनांक ६ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या पत्रकार दिन सोहळ्यामध्ये नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. मावळते अध्यक्ष मंदार दोंदे यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर करून त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मंचाच्या सदस्यांनी पत्रकारितेत फोफावत असलेल्या अपप्रवृत्तींना जागीच ठेचण्याची शपथ घेतली. दर्पण या पहिल्या वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी रोजी पहिला अंक प्रसिद्ध केला म्हणून दरवर्षी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे सल्लागार माधव पाटील यांनी आचार्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या नूतन कार्यकारिणीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील तर उपाध्यक्ष दीपक घोसाळकर असणार आहेत. सचिव पदी हरीश साठे यांची पुनरनिवड करण्यात आलेली असून सहसचिव म्हणून राजू गाडे जबाबदारी सांभाळतील तर खजिनदार या अत्यंत महत्त्वपूर्ण पदावरती दत्ता कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला सल्लागार माधव पाटील, सल्लागार विवेक पाटील, सल्लागार मंदार दोंदे, संजय कदम, सुनील राठोड यांच्यासह नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष दीपक घोसाळकर, खजिनदार दत्ता कुलकर्णी, सहसचिव राजू गाडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.