भारताचे संविधान आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य या विषयावर सुभाष वारे यांचे कोकण भवन येथे व्याख्यान
नवी मुंबई दि.11:- महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत “भारताचे संविधान आणि भारतीय नागरिकांचे कर्तव्य” या विषयावर सामाजिक कृतज्ञता निधीचे कार्याध्यक्ष श्री. सुभाष वारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम *दि. 19 एप्रिल 2022 रोजी समिती सभागृह, 1 ला मजला, कोकण भवन, नवी मुंबई येथे दुपारी 3.30 वाजता होणार* असून प्रादेशिक उपायुक्त कार्यालय, सामाजिक न्याय विभाग, कोकण विभागीय माहिती कार्यालय, आणि महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, कोकण भवन शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने दि.06 एप्रिल ते दि. 16 एप्रिल या कालावधीत "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम" राबविण्याचे निर्देश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत राज्यभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने कोकण विभागातही विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून संविधानाचे महत्त्व आणि डॉ. बाबासाहेबा आंबेडकरांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संविधानावर व्याख्यान करण्यासाठी प्रमुख वक्ता म्हणून लाभलेले श्री. सुभाष वारे यांनी भारतीय संविधानाला अपेक्षित जबाबदार नागरिकत्व घडण्यात प्रेरक ठरणाऱ्या “राष्ट्र सेवा दल” या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून चार वर्षे काम पाहिले आहे. भारतीय संविधान आणि त्यातील मुल्ये हा श्री. वारे यांच्या विशेष आस्थेचा आणि अभ्यासाचा विषय आहे. एस एम जोशी सोशालिस्ट फाऊंडेशनच्या वतीने आणि अनेक संघटनांच्या सहकार्याने मागील पाच वर्षे “संविधान साक्षरता अभियानात” शंभरहून जास्त शिबिरे आणि पाचशेपेक्षा जास्त व्याख्यानांचे आयोजन केले गेलेले आहे. भारतीय संविधानाचं हे महत्व सर्वांपर्यंत पोहचवण्याचा, देशाच्या भावी पिढीला संविधान साक्षर करुन लोकशाही मूल्यांवरील विश्वास अधिक दृढ करण्याच्या प्रयत्नातून या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी कोकण विभागातील अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक न्याय विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे, कोकण विभागीय माहिती उपसंचालक डॉ.गणेश मुळे आणि राजपत्रित अधिकारी महासंघ कोकण विभाग शाखेचे सचिव डॉ. गणेश धुमाळ यांनी केले आहे. ------------