महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या प्रयत्नांना यश.. नोटरी मुद्रांक तिकिटे राज्यातील सर्व उपकोषागारांत मिळणार
पनवेल - महाराष्ट्रातील नोटरीसाठी दिलासादायक ठरणारा महत्त्वाचा निर्णय बुधवारी जाहीर झाला आहे. नोटरी मुद्रांक तिकिटे (नोटरी स्टॅम्प) आता राज्यातील सर्व उपकोषागार कार्यालयांत उपलब्ध होणार आहेत. लेखा व कोषागारे संचालनालयाच्या कोकण विभागाने यासंदर्भातील आदेश बुधवारी जारी केले आहे. या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यातील उपकोषागारातून नोटरी मुद्रांक तिकिटांचा पुरवठा व विक्री प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यभरातील नोटरी कामकाज अधिक सुलभ, गतिमान व लोकाभिमुख करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. आतापर्यंत नोटरी मुद्रांक तिकिटे केवळ मुंबईतील मुख्य मुद्रांक पुरवठा कार्यालय किंवा मर्यादित ठिकाणी उपलब्ध होत होते. तसेच पनवेल, उरण, खालापूर आणि कर्जत तालुक्यातील पब्लिक नोटरी वकिलांना सध्या नोटरी तिकिटांसाठी अलिबाग येथील जिल्हा कोषागार कार्यालयात जावं लागतं. ही तिकीट पनवेल येथील उपकोषागार कार्यालयात उपलब्ध करून द्यावीत याबाबतचे निवेदन दि 18 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशन यांच्यातर्फे सहसंचालक, लेखा व कोषागारे, कोकण विभाग कोकण भवन, सीबीडी बेलापूर यांना देण्यात आले. यावेळी सहाय्यक संचालिका मॅडम श्रीमती गौरी अ. वारे यांनी याबाबत लवकरच योग्य ती कार्यवाही करून आपली मागणी पूर्ण करण्याचं विश्वासपूर्वक आश्वासन दिलं होतं. यावेळी महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशनचे राज्य अध्यक्ष सय्यद सिकंदर अली यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. नागेश हिरवे, रायगड जिल्हाध्यक्ष, ॲड. अस्मिता भुवड, महिला जिल्हाध्यक्ष रायगड, ॲड. रोहिदास आगलावे, पनवेल तालुका अध्यक्ष ॲड. सारिका लबडे, खालापूर तालुका अध्यक्ष, तसेच पनवेलचे नोटरी वकील ॲड. जानकर साहेब, ॲड. ज्योती उरणकर, ॲड. आर के पाटील, ॲड. कुंडलिक मोहिते, ॲड. निवृत्ती पावशे तसेच असोसिएशनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. यासाठी maharashtra आणि गोवा नोटरी असोसिएशन तर्फे सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवला होता. लेखा व कोषागारे संचालनालयाने याची दखल घेऊन नोटरी स्टॅम्प उपकोषागार कार्यालयांत उपलब्ध करून देण्याचे आदेश जारी केले आहेत. याबाबत अधिक माहिती देताना संघटनेचे प्रवक्ते व कोकण विभागाध्यक्ष अॅड. समीत राऊत म्हणाले, नोटरी स्टॅम्प मिळवण्यासाठी नोटरी वकिलांना जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत होते. ग्रामीण व उपनगरातील नोटरींसाठी ही प्रक्रिया खर्चिक आणि वेळखाऊ होती. आता ही सुविधा प्रत्येक तालुक्यातील उपकोषागारात उपलब्ध झाल्याने हजारो नोटरींना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले.