मोबाईलपासून मुलांना वाचवा : महेंद्रशेठ घरत
उलवे, ता. २९ : "वाचाल तर वाचाल असे म्हटले जाते, ते खरे आहे. महाविद्यालयीन जीवनात मी लायब्ररीत बसून अनेक पुस्तकांचा फडशा पाडला. त्यामुळे साहजिकच वाचनाची गोडी लागली. आजही सर्व वृत्तपत्रे आणि विमान प्रवासातही पुस्तके वाचतो. चौकमध्ये १९२० पासून वाचनालय सुरू आहे. वाचनालय सुरू करून त्याला १०६ वर्षे झालीत. वाचनालयाला ऐतिहासिक वारसा आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. आज तुपगावमध्ये ओमकार वाचनालय व ग्रंथालय सुरू करून आपण एक उत्तम काम केले आहे. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. आज जमाना बदललाय, त्यामुळे कालानुरूप डिजिटल लायब्ररीही हवी. समाजाचे आपण देणे लागतो, त्यानुसार मी काम करतो. जिथे गरज तिथे मी सहकार्य करतोय. आपल्या ताटातील अर्धी भाकर देण्याची दानत हवी. जेवढे वाचाल तेवढे आपण प्रगल्भ होतो. मी विचारांची लढाई लढतोय. जे जे चांगले करता येईल ते ते करा, पसायदानात ज्ञानेश्वर माऊलींनी जगाच्या कल्याणाचा विचार केलाय. अलीकडे मोबाईलमुळे लाईफस्टाईल बदलली आहे. घरातील महिलाही लहान मूल रडतेय म्हणून हातात मोबाईल देऊन त्याला गप्प बसवण्याचा प्रयत्न करतात. हे अत्यंत चुकीचे आहे, कारण मोबाईलच्या स्क्रीनमुळे लहान मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम होतो. तसेच ते लहान मूल पुढे हट्टी होऊन हातात मोबाईल असल्याशिवाय काही खात-पित नाही. त्यामुळे मुलांना मोबाईलपासून वाचवा," असे आवाहन आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी तुपगाव-चौक येथे केले. त्यांच्या हस्ते ओमकार वाचनालय व ग्रंथालयाचे रविवारी (ता. २८) उद्घाटन झाले. यावेळी वाचनालयाच्या वतीने महेंद्रशेठ घरत यांचा सन्मान करण्यात आला. ते पुढे म्हणाले, "पुस्तके ही काळाची गरज आहे, वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आपण हाती घेतलेला उपक्रम उत्तम आहे. त्यामुळे ५१ हजारांची मदत पुस्तकांसाठी करतोय. आपणास हवी ती विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी पुस्तके खरेदी करा." माजी सरपंच शांताराम भधे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, कॉंग्रेसचे युवा अध्यक्ष निखिल ढवळे, तालुका अध्यक्ष देविदास म्हात्रे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनायक देशमुख, उद्योजक आप्पा देशमुख, विनोद भोईर, दिनेश गावडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश मागावकर यांनी केले.