हिंद की चादर" श्री गुरु तेग बहादूर यांच्या शहिदी समागम कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वांनी समर्पण भावनेने काम करावे* *-जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे*
• Raju pandharinath gade
*नवी मुंबई,(विमाका) दि.13:-* "हिंद- की-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम खारघर येथे दि.21 डिसेंबर 2025 आयोजित केला जाणार आहे. श्री गुरु तेग बहादूर यांच्या शहिदी समागम कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने आणि समर्पण भावनेने काम करावे, असे आवाहन रायगड जिल्हाधिकारी श्री. किशन जावळे यांनी उपस्थित संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आणि समाजाच्या पदाधिकाऱ्यांना केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनाची पूर्वतयारी बैठक आज पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, पनवेल परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, पोलीस विशेष शाखा उपायुक्त रश्मी नांदेडकर, पनवेल महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे, पनवेल प्रांताधिकारी पवन चांडक, धर्मजागरण विभागाचे महेंद्र रायचुरा,अल्पसंख्याक आयोग समिती सदस्य हॅपी सिंग यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी गुरुद्वारा प्रतिनिधी, सामाजिक संस्थेंचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.
या बैठकीत जिल्हाधिकारी श्री.जावळे यांनी आगामी कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात आवश्यक मार्गदर्शन केले. श्री. गुरु तेग बहादूर साहिब यांच्या जीवनकार्याचा प्रसार, त्यांच्या कार्याची जनजागृती आणि समाजातील सर्व घटकांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या सुरुवातीस मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी 21 डिसेंबर रोजी खारघर येथे होणाऱ्या या समागम कार्यक्रमाची सविस्तर रुपरेषा मांडली. राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग व "हिंद-की-चादर" श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या 350 व्या शहीदी समागम वर्षानिमित्त राज्यातील नांदेड, नागपूर, नवी मुंबई येथील खारघर येथे हा कार्यक्रम होणार आहे. खारघर येथील या कार्यक्रमास शीख, सिकलीकर, बंजारा-लबाना, मोहियाल, सिंधी व इतर समाज यांच्या संयुक्त विद्यामाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या एकदिवशीय समागम कार्यक्रमात सर्व समाजाचे संत, मंहत, कथावाचक, किर्तनकार, मार्गदर्शन करणार आहेत. समागामाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जागर व्यवस्थापन समिती सभास्थळ व्यवस्थापन समिती, मंडप व्यवस्थापन समिती, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, लंगर व्यवस्था आदी विविध 26 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
या बैठकीच्या निमित्ताने धर्म जागरण विभागाचे क्षेत्र प्रमुख श्री महेंद्र रायचूरा यांनी कार्यक्रमाबाबत बहुमोल मार्गदर्शन केले.
बैठकीचे सूत्रसंचालन सुखविंदर सिंग धिल्लोन यांनी केले.
000000
