लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त पनवेल तालुका पत्रकार मंचाचे समाजोपयोगी उपक्रम
पनवेल (प्रतिनिधी) गोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाचे वर्ष अनेक उपक्रमांद्वारे साजरे होत आहे. पनवेल तालुका पत्रकार विकास मंच या सामाजिक उपक्रमात अग्रभागी असणाऱ्या व सक्रिय पत्रकारांच्या नोंदणीकृत संस्थेने लोकनेते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमांची घोषणा केली आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून मंचातील सदस्यांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते पाच लाख रुपयांच्या अपघात विमा संरक्षण पॉलिसीचे वाटप आज (दि. १०) रोजी करण्यात आले. यावेळी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे अध्यक्ष मंदार दोंदे यांनी प्रास्ताविक सादर केले. अपघात विमा पॉलिसी वाटप करत असतानाच आगामी महिन्याभरात अमृत महोत्सवी जन्मदिनाच्या औचित्याने दोन सामाजिक उपक्रम साजरे करण्यात येणार आहेत. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अंगी असणारा दातृत्वाचा गुण आगामी पिढ्यांना समजावा या उदात्त भावनेने " सन्माननीय रामशेठ ठाकूर... एक अलौकिक दानशूर व्यक्तिमत्व" या विषयावर शालेय विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पनवेल उरण तालुक्यामध्ये समाजातील प्रत्येक स्तरातल्या विद्यार्थ्याला शिक्षण घेता यावे या उदात्त हेतूने ते शैक्षणिक क्षेत्रात देत असलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल " सन्माननीय रामशेठ ठाकूर... शिक्षणाची गंगा आणणारे शिक्षण महर्षी " या विषयावर देखील विद्यार्थ्यांना निबंध लेखन करता येणार आहे. पहिली ते पाचवी, सहावी ते दहावी आणि महाविद्यालयीन गट अशा तीन गटांच्यात ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर डिसेंबर महिन्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या अनुषंगाने पनवेल परिसरात पंच्याहत्तर देशी बहुवार्षिक वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्यावतीने यावेळी करण्यात आली. यावेळी तमाम उपक्रमांबाबत प्रतिक्रिया देत असताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल तालुका पत्रकार विकास मंच करत असलेल्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. तसेच हाती घेतलेल्या समाजोपयोगी उपक्रमांकरिता शुभेच्छा दिल्या, व हे सर्व कार्यक्रम निश्चित यशस्वी होतील असा विश्वास त्यांनी दर्शविला. पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाच्या सदस्यांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या अपघात विमा संरक्षण पॉलिसी प्रदान करण्यात आल्या आहेत. सदर पॉलिसी वितरण कार्यक्रमाला ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे पनवेल शाखा प्रभारी मिथिलेश चौबे, व्यवसाय सहयोगी राजेंद्र शहा, विमा पारदर्शकता प्रतिनिधी प्रतीक शहा यांची देखील उपस्थिती होती. यावेळी पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे अध्यक्ष मंदार दोंदे, सल्लागार विवेक पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, खजिनदार संजय कदम, सरचिटणीस हरेश साठे,प्रवीण मोहोकर, दत्ता कुलकर्णी, दीपक घोसाळकर, राजू गाडे आदी मंचाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते. चौकट- लोकनेते रामशेठ ठाकूर हे राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य देणारे लोकनेते म्हणून ओळखले जातात. गेल्या पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी समाजकार्यातील अखंड परंपरा जपली असून, आजही ती त्याच जोमाने सुरू आहे. यंदा त्यांच्या अमृत महोत्सवी (७५व्या) वर्षाचे औचित्य साधून कीर्तन महोत्सव, भजन स्पर्धा, रक्तदान शिबीर, शिधा वाटप, विविध क्रीडा स्पर्धा, नाट्य महोत्सव, वक्तृत्व स्पर्धा, संगीत मॅरेथॉन अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्ण वर्षभर विविध सामाजिक कार्यक्रमांच्या माध्यमातून या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याच धर्तीवर पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्यावतीनेही समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Popular posts
नॅशनल बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये पनवेलच्या रोणाल पाटीलने पटकाविले रौप्यपदक ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
इमेज
गोवा मुक्ती संग्रामातील हुतात्मा हिरवे गुरुजी यांची १०४ वी जयंती साजरी
इमेज
आमदार विक्रांत पाटील यांना महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचालन समितीमध्ये 'राज्य निवडणूक समन्वयक' म्हणून विशेष जबाबदारी
इमेज
जेष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं निधन
इमेज