जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना मंगळवारी सुट्टी
*रत्नागिरी, दि.१८ (जिमाका)- हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात उद्या १९ आॕगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आलेली आहे. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असून, पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना उद्या १९ अॕगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असा आदेश आज काढण्यात आला आहे.* प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरुन जिल्हाधिकारी त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन, संपूर्ण जिल्ह्याकरिता अथवा जिल्ह्यातील ठराविक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे जिल्हाधिकारी यांना सक्षम प्राधिकारी म्हणून प्रदान करण्यात आले आहे. ​ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. ​ हवामान विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रत्नागिरी जिल्ह्यात उद्या दि १९ आॕगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने तसेच खेड तालुक्यातील जगबुडी नदीने धोका पाणळी ओलांडली आहे. संगमेश्वर येथील शास्त्री, राजापूर येथील कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, याकरिता जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना उद्या दिनांक 19/08/2025 रोजी सुट्टी असणे आवश्यक आहे. ​ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना उद्या दिनांक 19/08/2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असे आदेशात म्हटले आहे.