डीएवी पब्लिक स्कूलमध्ये युनिट टेस्टसाठी मराठीचा समावेश; भाजपच्या पाठपुराव्याला यश
पनवेल (प्रतिनिधी) नवीन पनवेलमधील डीएवी पब्लिक स्कूलच्या इयत्ता तिसरी, चौथी व पाचवीच्या युनिट टेस्टच्या वेळापत्रकातून मराठी विषय वगळण्यात आल्याच्या तक्रारी पालकांकडून प्राप्त झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने शाळा प्रशासनाकडे ठोस पाठपुरावा केला. यानंतर शाळा व्यवस्थापनाने तातडीने मराठी भाषेचा समावेश करत सुधारित वेळापत्रक जारी केले आहे.
भाजपचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, नवीन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे यांनी शाळा प्रशासनास निवेदन दिले आणि मुख्याध्यापक श्री. घोष यांच्याशी याबाबत चर्चा केली. या वेळी माजी नगरसेवक समीर ठाकूर, प्रभाकर बहिरा, राजश्री वावेकर, किशोर चौतमोल, रुपेश नागवेकर, केदार भगत, प्रशांत शेट्ये, महेश राऊळ, भीमराव पोवार, वरुण डंगर, विवेक होन आदी उपस्थित होते.
"मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा असून शालेय अभ्यासक्रमातून किंवा परीक्षांमधून तिचा वगळलेला समावेश अत्यंत निषेधार्ह आहे," असे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगत, मराठी विषय युनिट टेस्टमध्ये न समाविष्ट केल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला होता. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत पुढील युनिट टेस्टमध्ये मराठी विषयाचा समावेश करत सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध केले. त्यामुळे तात्काळ कार्यवाही केल्याबद्दल शिष्टमंडळाने श्री. घोष यांचे पुष्पगुछ देऊन आभार व्यक्त केले. तसेच पालकांनीही समाधान व्यक्त करत भारतीय जनता पार्टी आणि शाळा प्रशासनाचे आभार मानले आहेत.