१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत
नवी मुंबई, दि. ०७ (विमाका):- राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांचा गौरव करणारा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज संपन्न झाला. क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कोकण विभागातील एकूण नऊ कार्यालयांची निवड गौरवासाठी करण्यात आली.
या कार्यक्रमात राज्यभरातील विविध विभागांतील कार्यालयांनी दाखवलेली उल्लेखनीय कामगिरी ओळखून त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांच्या यादीत कोकण विभागीय आयुक्त कार्यालय यांना प्रथम क्रमांक मिळाला. कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला.
राज्य शासनाने प्रशासनिक कामकाजात गतिशीलता, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवांचे वितरण यासाठी "१०० दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम" राबवला. या कार्यक्रमात कार्यालयीन कामकाजात नवकल्पना व तंत्रज्ञानाचा वापर, प्रमाणवेळेत सेवा वितरण, ई-ऑफिस, डिजिटायझेशन आणि कागदविरहित व्यवहार, नागरिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण, कार्यसंस्कृती सुधारण्यासाठी अंतर्गत सुधारणा व प्रशिक्षण हे महत्वाचे घटक होते.
या उपक्रमाचा उद्देश शासकीय कार्यालयांचे कामकाज अधिक गतिमान, प्रभावी आणि उत्तरदायी बनवणे हा होता. राज्यातील सर्व विभाग, जिल्हा व तालुका स्तरावरील कार्यालयांना ठरावीक निकषांवर मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये सेवा वितरणाची वेळ, जनसंपर्क व प्रतिसाद, नविन उपक्रमांची अंमलबजावणी, डिजिटायझेशनचे प्रमाण, नागरिकांच्या समाधानाचे मोजमाप या बाबींचा समावेश करण्यात आला होता.
*महानगरपालिकांचा गौरव*
महानगरपालिका कार्यालयांच्या गटात उल्हासनगर महानगरपालिका यांनी बाजी मारली. आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे यांना प्रथम क्रमांक देऊन गौरविण्यात आले. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिका यांनी तिसरा क्रमांक पटकावला असून आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.तसेच पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांना चौथ्या क्रमांकासाठी गौरविण्यात आले.
*मुख्य कार्यकारी अधिकारी गटात ठाण्याचा झेंडा*
मुख्य कार्यकारी अधिकारी गटात ठाणे जिल्हा परिषद यांनी आघाडी घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मोहन घुगे यांना प्रथम क्रमांक मिळवून दिला. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाखाली जिल्हा परिषद कार्यालयाने प्रशासनात सुधारणा करत उल्लेखनीय प्रगती साधली.
*पोलीस विभागातील गौरव*
पोलीस आयुक्तालय गटात मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय यांना प्रथम क्रमांक बहाल करण्यात आला. पोलीस आयुक्त मा. मधुकर पांडे यांचा यासाठी सन्मान करण्यात आला. तसेच, परिक्षेत्र पोलीस उपमहानिरीक्षक गटात संजय दराडे, कोकण परिक्षेत्र यांनी प्रथम क्रमांक मिळवला. पोलीस अधीक्षक गटात, पालघरचे पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांना पहिल्या क्रमांकाने गौरवण्यात आले.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमाद्वारे राज्य शासनाने प्रशासनातील उत्कृष्टतेला प्रोत्साहन दिले असून, यामुळे कार्यपद्धतीत गती, पारदर्शकता आणि नागरिकाभिमुख सेवा देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक करत यापुढील काळात आणखी व्यापक सुधारणा राबविण्याचे संकेत दिले.
00000000